| रायगड जिल्हा | प्रतिनिधी |
अलिबाग-पेण, अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरूड या रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविताना अपघात होत आहेत. नागरिकांना या खड्डयाचा खुप त्रास होत आहे. याबाबत वारंवार प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडून ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे आज जनतेच्या हितासाठी शेकाप स्टाईलने आंदोलन करण्यात आले आहे. जो पर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी लेखी आश्वासन देत नाही. दिवाळीपूर्वी रस्ते चांगले करीत नाहीत. तो पर्यंत हा लढा असाच चालू राहणार आहे. सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी जिवाशी खेळ चालविला आहे. त्यामुळे सर्वमान्यांचे हाल खपवून घेणार नाही, असा सज्जड दम शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला.
शेकापच्या वतीने अलिबाग – पेण मार्गावरील पेझारी चेक पोस्ट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या.
यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून शेतकरी कामगार पक्षाने काम केले आहे. स्व. नारायण नागू पाटील, स्व.प्रभाकर पाटील तसेच माजी राज्यमंत्री शेकापच्या नेत्या स्व. मीनाक्षी पाटील यांच्या नेतृत्वाखाली याच भूमीत अनेक यशस्वी लढे झाले आहेत.आजही सर्वसामान्यांच्या हितासाठी शेकाप नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेझारी चेकपोस्ट येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात असंख्य कार्यकर्ते व नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले आहेत. हाच खरा शेकापचा विजय आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव खड्डयातून गेला. दिवाळीदेखील खड्डयातून जाऊ देणार नाही. येत्या दहा दिवसांत खड्डे बुजविण्याचे काम पुर्ण झाले पाहिजे. दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या अगोदरच रस्त्यांवरील खड्डे सुस्थितीत भरून गेले पाहिजे. आज पासून 24 तासाच्या आत 8 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली पाहिजे. अन्यथा पहिली दिवाळी याच रस्त्यावर हातात पणत्या घेऊन साजरी केली जाईल अशा इशारा चित्रलेखा पाटील यांनी दिला.







