आ. जयंत पाटील यांच्या मागणीला यश

नारंगीचा टेप येथील गोविंदाच्या मृत्यूप्रकरणी 10 लाखाची मदत; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील नारंगी टेप येथील दहीहंडी खेळताना पडून मृत्युमुखी पडलेल्या सचेंद्र तानाजी पाटील यांच्या कुटुंबियांना शासनाच्यावतीने दहा लाखांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.23) विधानपरिषदेत केली. शेकापचे आ. जयंत पाटील यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. त्याबाबत सरकारने सकारात्मक भुमिका घेत मदत जाहीर केली.

नारंगीचा टेप येथील ग्रामस्थ मंडळाच्या वतीने दि.19 ऑगस्ट 2022 रोजी दहिहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे प्रवेशद्वाराच्या कमानीच्यावर दहीहंडी बांधण्यात आली. यावेळी दहिहंडी फोडण्यासाठी तीन थर लावण्यात आले. गावातील सचेंद्र तानाजी पाटील (वय 36) हा दहीहंडी फोडीत असताना त्याचा पाय घसरल्याने त्याचे डोके कमानीवर आदळले आणि रस्त्यावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शेकापचे आ. जयंत पाटील यांनी गोविंदाला अर्थसहाय्य करण्याची मागणी सभागृहात केली होती. त्यांची मागणी मान्य करीत उपमुख्यमंत्री यांनी 10 लाख रुपये मदत करण्याची घोषणा केली.

अलिबाग तालुक्यामध्ये दहीहंडी फोडताना यावर्षी सुमारे 86 दुर्दैवी घटना घडल्या. त्यामध्ये फक्त नारंगी टेप येथील घडलेल्या घटनेमध्ये सचेंद्र तानाजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

घरातील तरुण मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने पाटील कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे सचेंद्रच्या वारसदारांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी आ.पाटील यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भुमिका घेतली आहे.

Exit mobile version