शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मोरोंडे ते आदिवासी, ठाकूर वाड्यावस्त्यांपर्यंत रस्ता आणि मोरखोल येथे जलजीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा या विकास कामांचा शुभारंभ बुधवारी झाला. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ वाढवून कामांना सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य मधू पारधी, बोरघरचे माजी सरपंच मधुकर ढेबे, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र गुंड, रमेश गुंड, दिनेश तावडे, चांगू लेंडी, कृष्णा पारधी, निलेश मोरे आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
मोरोंडे ते डोंगरभागातील सत्यवाडी, होंडावाडी, तागवाडी व बारशेतपर्यंत जाण्यासाठी ठक्कर बाप्पा सुधार योजनेंतर्गत रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले आहे. शेकाप नेते आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने हा निधी उपलब्ध करून दिला आहे. मोरखोल येथील गावातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, घरपोच पाण्याची सुविधा निर्माण व्हावी, यासाठी शेकापचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने जलजीवन योजना मंजूर करण्यात आली.
रस्त्याच्या कामासह जलजीवन योजनेच्या कामाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. यासाठी रामचंद्र गुंड, व मधुकर ढेबे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे आदिवासी, ठाकूर वाड्यावस्त्यांपर्यंत जाणारा मार्ग आता सुकर होणार असून, मोरखोल येथील नागरिकांना पाण्याची व्यवस्था अधिक चांगल्या पध्दतीने होणार असल्याचा विश्वास मधुकर ढेबे यांनी व्यक्त केला.