ग्रामस्थांच्या मागणीला महावितरणचे सहकार्य
| रसायनी | वार्ताहर |
कोयना प्रकल्पग्रस्त चौक वावंढळ वसाहतीबरोबर इतर गावांच्या विद्युतपुरवठा करणार्या उपकरणांचे नूतनीकरण करण्याचा शुभारंभ महावितरणचे कार्यकारी अभियंता लटपटे यांच्या हस्ते सरपंच सुहास कदम व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाला.
कोयना धरण प्रकल्पामुळे जांब्रूक गावची वसाहत खालापूर तालुक्यातील चौक वावंढळ येथे सन 1959 साली झाली. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने तेथे विद्युतपुरवठा करण्यात आला. सुरुवातीला छोटी असलेली वसाहत मोठी होत गेली. अनेक घरे निर्माण झाली, गावच्या बाजूलाच शहरीकरण सुरु झाले. विद्युतपुरवठा करणारी उपकरणे खराब होत गेली, तर काही सडून गेली. खराब उपकरणांमुळे विद्युतपुरवठा वारंवार खंडित होणे, कमी दाबाने पुरवठा होणे, विद्युत वाहिनी खराब होऊन तुटू लागल्या, विद्युत प्रवाह कमी-जास्त होणे, लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिन्यंमुळे जीविताला धोका निर्माण झाला होता, विद्युत खांब सडणे, नवीन विद्युत खांब उभे करणे, विद्युतपुरवठा कमी दाबाने निर्माण झाल्याने घरातील उपकरणे निकामी होणे, उपकरणे जळून जाणे, असे प्रकार घडू लागले होते.
याबाबत ग्रामस्थ यांनी वारंवार विद्युत मंडळ यांना लेखी तक्रार केली होती. याच कारणांनी ग्रामस्थ आक्रमकदेखील झाले होते. याबाबत खालापूरचे उपकार्यकारी अभियंता मुंडे व चौकचे सहाय्यक अभियंता बोधनकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे दुरुस्ती व पुनर्रचना प्रस्ताव सादर केला होता. ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने या मागणीला यश येऊन आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. त्याचा शुभारंभ कार्यकारी अभियंता लटपटे यांनी श्रीफळ वाढऊन केला.
यावेळी ते म्हणाले, राज्याला विद्युत प्रकाशात घेऊन येणारी गावे नेहमीच प्रकाशित राहिली पाहिजेत. आमच्याकडून नेहमीच सहकार्य मिळेल. यावेळी ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व अधिकार्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपसरपंच अमोल कदम, कनिष्ठ अभियंता श्रीमती राठोड, विलास कदम, जयवंत कदम, राजाराम कदम, कृष्णा कदम, परशुराम कदम, रवींद्र कदम, प्रसाद कदम, जयराम कदम, रोहन कदम, दत्ता कदम, जनमित्र पवार, आवाड, मोहन भुईकोट, दिलीप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.