आदिवासी वाडी रस्त्याच्या कामाचे शुभारंभ

ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या प्रयत्नांना यश

| पेण | प्रतिनिधी |

तालुक्यातील पाच आदिवासी वाडयापैकी उंबरमाळ आदिवासी वाडीच्या रस्त्याच्या खडीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आता दळणवळणासाठी चांगले रस्ते मिळणार आहेत.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही येथील आदिवासीवाडीतील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता. अशा वाड्यांवर सोयी-सुविधांची चांगलीच वाणवा होती. वाड्यांवर रस्ते नसल्याने त्यांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. वाड्यांवर रस्ते पोचले पाहीजेत. यासाठी सामाजिक संस्थांनी आंदोलने, मोर्चे काढून प्रशासनासह सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि महाराष्ट्र स्टुडंट युनियन या संघटनांनी आदिवासी बांधवांसोबत पुकारलेल्या लढयाला आता यश आले आहे. सोमवारी येथील उंबरमाळ आदिवासीवाडीच्या खडीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आले.

पेण शहराला लागून असलेल्या उंबरमाळ खाऊसावाडी, काजूचीवाडी, तांबडी, केळीचीवाडी या आदिवासीवाड्यांना हक्काची ग्राम पंचायत तर सोडाच परंतु रस्ता, पाण्यासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. या सर्व समस्यांना सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी पाचही आदिवासी वाडयातील आदिवासी बांधवांना सोबत घेऊन मोर्चे, आंदोलने काढून पाठपुरावा सुरुच ठेवला होता. खवसावाडी हा रस्ताही सहा महिन्यापूर्वी मंजूर झालेला असताना त्याचा कार्यारंभ आदेश देऊनही ठेकेदाराने कामाला सुरूवात केलेली नाही त्यामुळे येत्या पंधरा दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरूवात न केल्यास आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल. कामाला सुरुवात झाल्याने उंबरमाळमधील आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दिसत होता. या प्रसंगी प्रजापिता ईश्वरीय ब्रह्याकुमारी पेण शाखेचे किशोर पाटील, सुनीता पाटील, स्थानिक आदिवासी कार्यकर्ते सुनील वाघमारे, गुळसुंदे ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, राम राऊत, यशवंत वाघमारे, मंगल वाघमारे, किसन पवार, कमळी पवार, सुमन पवार, शिमग्या हिलम, रेणुका हिलम, सचिन पवार, रुपाली वाघमारे, गीता वाघमारे यांच्यासह उंबरमाळमधील आदिवासी बांधव उपस्थित होते.

Exit mobile version