मा.आ.पंडीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पेझारी । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील खारपट्टी जोडला गेलेला अलिबाग पेण मार्गावरील सर्वात महत्वाचा पेझारी-शहापूर-धेरंड हा रस्ता मा.आ.पंडीत पाटील आमदार असताना एमआयडीसी कडून मंजुन करून राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रयत्नांतून निधी उपलब्ध करून घेतला असून बुधवारी (दि.17) पंडीत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्या भावना पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शेकापचे जिल्हा चिटणीस अॅड.आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, अलिबाग पंचायत समिती सदस्या रचना थोरे पाटील, पंचायत समिती सदस्य सुधीर थळे, युवानेते सवाई पाटील, आंबेपूर सरपंच सुमना पाटील, पेझारी सरपंच प्राजक्ता म्हात्रे, उपसरपंच अॅड.मनोज धुमाळ, शहापूर उपसरपंच महेश पाटील, पेझारी माजी उपसरपंच श्रीदास म्हात्रे तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पंडीत पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, मी आमदार असताना पेझारी चेकपोस्ट ते शहापूर धेरंड हा रस्ता मी मंजुर केला. परंतु त्यावेळी या कामाला राज्य सरकार व राज्यकर्त्यांनी मंजुरी दिली नाही व हा रस्ता आपल्याला मिळू नये यासाठीही प्रयत्न झाले. परंतु आज तेच काम मंजुर करून त्याचा शुभारंभही माझ्याच उपस्थितीत होते आहे. तसेच केंद्र व राज्य सरकार देशामध्ये अनेक रस्ते तयार करीत आहे. हजारो कोटी खर्च करीत आहे. परंतु अलिबाग-वडखळ या रस्त्यासाठी निधी उपलब्ध नाही. आज वाढत्या रहदारीमुळे अलिबागला जायला दोन तास लागतात. त्यामुळे भविष्यामध्ये जर या रस्त्याला राज्य व केंद्राने निधी उपलब्ध करून दिला नाही तर मात्र रस्त्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही यावेळी माजी आ.पंडीत पाटील यांनी दिला.