। उरण । वार्ताहर ।
राज्यातील रायगड जिल्ह्यातील सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता ती देण्यास अधिकारी वर्गाकडून टाळाटाळ केली जात आहे. तरी याची आयुक्त अतुल पाटणे यांनी चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. तसेच, उरणमधील बोटींसाठी असलेला डिझेल पंप व त्याची जागाही गायब केल्याची धक्कादायक माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळात आहे.
रायगड जिल्ह्यातील मत्स्यविभागाचा भ्रष्ट कारभाराचा बोलबाला सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भ्रष्ट कारभार सुरू आहे. याबाबत अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध करूनही मत्स्यविभागाचे अधिकारी वर्ग आर्थिक साटेलोटामुळे याकडे दुर्लक्ष करीत आहेत. प्रामुख्याने पावसाळी मासेमारीस बंदी असतानाही उरण परिसरात प्रामुख्याने करंजा बंदरात उघडपणे अधिकारी वर्गाच्या वरदहस्ताने मासेमारी सुरू असते. तसेच, पर्सनेट व एलईडी मासेमारी बंदी असतानाही ती रायगड जिल्ह्यात खुलेआम अधिकारी वर्गाच्या देखरेखीखाली सुरू आहे. याबाबत आयुक्त अतुल पाटणे यांच्याकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. याचा अर्थ सर्वांची मिलीजुळी भगत असल्याचे उघड होते.
मत्स्यविभागाचा भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी तक्रारदारांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. मुदतीत माहिती न देता सदर माहिती संबंधित विभागाकडून घेण्यात यावी, असे पत्र मत्स्यविभागाने तक्रारदारांना दिले होते. यावरून यामध्ये नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्यामुळेच मत्स्यविभागाचे अधिकारी वर्ग माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा संशय तक्रारदारांनी व्यक्त केला आहे.