आक्षीच्या विकासासाठी कटिबद्ध; आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन

। आक्षी ।  प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आक्षीचा विकास झाला असून, आगामी काळात सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ. जयंत पाटील यांनी केले. शुक्रवारी साखर येथील गणपती मंदिरात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहनही आ. पाटील यांनी यावेळी केले.

अलिबाग तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी आ. जयंत पाटील येथे आले होते. यावेळी आ. जयंत पाटील यांच्यासह तालुका चिटणीस अनिल पाटील, जि.प. माजी सदस्य संजय पाटील, प्रियदर्शनी पाटील, जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य मनोज भगत, माजी सरपंच नंदकुमार वाळंज यांच्यासह सरपंच व सदस्यपदाचे उमेदवार उपस्थित होते.

यावेळी आ. जयंत पाटील म्हणाले की, आक्षीमध्ये शेकापच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. आक्षीच्या मुख्य रस्त्याचे काम, एमआयडीसीच्या माध्यमातून घरोघरी शुद्ध नळपाणी पुरवठा, साखर जेट्टीचे काम आदी विविध कामे करण्यात आल्याचे ते म्हणाले.

आक्षीचे सरपंच नंदकुमार वाळंज यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून, तालुक्यातील नंबर एकचे सरपंच असल्याचा गौरव त्यांनी आपल्या भाषणात केला. तसेच सरपंचपदाच्या उमेदवार रश्मी रवींद्र पाटील यांनी सदस्य असताना कोरोनाकाळात घरोघरी लसीकरणासाठी महत्त्वाची जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडली आहे. त्यामुळे सरपंच आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहनही आ. पाटील यांनी यावेळी केले.

भविष्यातही मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याचा संकल्प असून, तो तडीस जाण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही आ. जयंत पाटील यांनी दिली. या सभेस शेकाप, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version