| पोयनाड | विजय चवरकर |
आदिवासींच्या चेहर्यावर समाधन दिसत आहे. त्यांच्या राहणीमानात बदल झाला आहे. त्यांचा जीवनस्तर उंचावतोय, हेच आपले खरे यश आहे, असे उद्गार शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी काढले. रविवार, दि. 6 मार्च रोजी कोळघर येथे चित्रलेखा पाटील यांच्या संकल्पनेतून शेकापच्या माध्यमातून गरीब-गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आ. पंडित पाटील, अलिबाग पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर, जि.प. सदस्या चित्रा पाटील, विक्रांत वार्डे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन, सरस्वती पूजनाने झाली. ग्रामपंचायतीचे उपसरपंच शैलेश पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक जी.एस. पाटील यांनी केले.
आ. जयंत पाटील पुढे म्हणाले, अभ्यासू आमदार असते तर अधिक विकासकामे होतात. आमदार बदलला, तालुका दहा वर्षे मागे गेला. ताडवागळे हा दुर्गम विभाग आहे. या विभागाच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष सतत आघाडीवर राहिला आहे. या विभागातील बैलखिंड व पिरखिंड हे दोन रस्ते मंजूर केले आहेत. त्यामुळे मुरुड, नागावकडे जाणारे पर्यटक या रस्त्याने जातील. पर्यटक वाढतील. पर्यटकांना समुद्र हवा तसा, डोंगरमाथा हवा, त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार मिळेल. रस्त्यामुळे विभगाचा विकास होईल. माजी स्व. सरपंच दीनानाथ पाटील यांचा मुलगा शैलेश पाटील चांगले काम करतोय, हे सांगताना ताडवागळे पाणीपुरवठा योजनेचे पाणी प्रत्येक घरामध्ये पोहोचले, तसेच डोंगरमाथ्यावर वाघजई वाडीवरील आदिवासी समाज सर्वात जास्त प्रामाणिक आहे. 90 टक्के शेतकरी कामगार पक्षाबरोबर आहे. मी बारशेत येथे गेलो होतो. बारशेत-रुईशेत-भोमोली रस्ता करण्यात येणार आहे, त्यामुळे डोंगरमाथ्यावरील आदिवासीवाड्या जोडल्या जातील. ताडवागळे विभागाच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष कटिबद्ध आहे, असेही आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी विभागातून आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पाटील यांनी केले. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य नावजी शिद, नारायण पारधी, वनिता पाटील, अर्चना हंबीर, सविता लोभी आदी उपस्थित होते.
आदिवासी मुलांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. गरीबांची मुले शिकली पाहिजे, हा मुख्य हेतू समोर ठेवून चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप कार्यक्रम शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सुरु केला आहे. आतापर्यंत आठ ते नऊ हजार सालकलींचे वाटप करण्यात आले आहे.
आ. जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस