जिजाऊ ब्रिगेडतर्फे भव्य सोहळा
| चणेरा | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रोहा तालुक्यातील धोंडखार येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवप्रेमी नागरिक, महिला, युवक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी शिवरायांच्या अद्वितीय पराक्रमाचे, स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या संघर्षाचे तसेच त्यांच्या लोककल्याणकारी आणि न्यायनिष्ठ राज्यकारभाराचे स्मरण करत कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी आणि शिवगर्जनांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्षा सुनंदा मोहिते, उपजिल्हाध्यक्षा सुप्रिया पाशिलकर, पोलीस मित्र संघटना जिल्हाध्यक्ष हरीचंद्र वाजंत्री, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा जनसंपर्क प्रमुख मानसी क्षीरसागर, मुरुड तालुकाध्यक्षा निर्मला म्हात्रे, वैशाली, साधना शाह, पोलीस मित्र संघटना तालुकाध्यक्ष सत्यप्रसाद आडाव, दीपक म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले.
ग्रामस्थ, महिला, युवक आणि शिवप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेला हा राज्याभिषेक दिन सोहळा प्रेरणादायी, ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात आणि स्वराज्याच्या प्रेरणेने भारलेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.






