चित्रलेखा पाटील यांचे प्रतिपादन; अनेक आदिवासीवाड्यांचा शेकापमध्ये प्रवेश
। अलिबाग । प्रतिनिधी ।
सामाजिक क्षेत्र असो, वा राजकारण, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक असा प्रत्येक क्षेत्रात चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी मोलाची कामगिरी केली आहे. सायकल वाटप, घरकूल आदी उपक्रमांमुळे त्या घराघरात पोहचल्या आहेत. असंख्य कुटुंबात पडत्या काळात त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेकांना सावरून गेला. आदिवासीवाडी असो वा एखादे गाव त्या आदिवासींच्या कुटुंबाची सावली बनल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन मुरूड व रोहामधील कोकबन, घानवाडी, आरावघरवाडी येथील आदीवासीवाडीमधील असंख्य महिला, पुरुष व तरुण मंडळींनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा वेश्वी येथील त्यांच्या निवासस्थानी साध्या पध्दतीने शुक्रवारी (दि.11) पार पडला आहे. वाड्या वस्त्यांमधील प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबध्द असल्याचा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी दिला. त्यामुळे आदिवासीवाड्यांना ताईच्या सावलीचा आधार मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अलिबाग विधानसभा मतदार संघातील मुरूड व रोहा तालुक्यातील घानवाडी, आरावघरवाडी, कोकबन आदिवासी वाडी येथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. विद्यमान आमदारांना निवडून देऊनही त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या वाड्यांचा विकास शेकापच करू शकतो, असा विश्वास घानवाडी, आरावघरवाडी, कोकबन आदिवासी वाडीमधील ग्रामस्थ महिलांमध्ये निर्माण झाला. शुक्रवारी या वाड्यांमधील असंख्य महिला, पुरुष व तरुण मंडळींनी एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आदीवासीवाड्यांमधील प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबध्द आहे. हक्काची घरे मिळावी यासाठी घरकूल योजना राबविली जाईल. रोजगाराचे साधन खुले व्हावे यासाठी प्रयत्न केला जाईल असा विश्वास चित्रलेखा पाटील यांनी दिला. शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील तळागाळातील घटकांसाठी काम करीत आहेत. मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप केल्या जात आहेत. गोरगरिबांना हक्काचे घर मिळावे यासाठी ताईची सावली या उपक्रमातून घरकूल योजना राबविण्यात आली आहे. अनेकांना ताईच्या सावली आधार देण्यात आला आहे. शेवटच्या घटकापर्यंत काम करणार्या चित्रलेखा पाटील यांच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन अनेक गावे, वाड्या, वस्त्यांमधील महिला शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे ताईची सावली आदिवासीवाड्यांसाठी आधार बनणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.







