| पनवेल | प्रतिनिधी |
दारूच्या नशेत थेट पोलीस ठाण्यात घुसून गोंधळ घालत पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात कामोठे पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांना शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश पांडुरंग पवार (38) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश पवार हा कामोठे सेक्टर 7 परिसरात राहतो. तो दारूच्या नशेत कामोठे पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर त्याने मोठमोठ्याने आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच, पोलिसांना अरेरावीची भाषा वापरून धमकावले. पोलिसांची नोकरी घालविण्याची धमकी देत त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केला.





