। छ.संभाजीनगर। वृत्तसंस्था ।
छ.संभाजीनगरमधील वाळूज औद्योगिक परिसरातील एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीत मध्यरात्री आग लागून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर, चार जणांना आपला जीव वाचवण्यात यश आलं आहे.
वाळूज औद्योगिक परिसरातील सी 216 येथील सनशाईन एंटरप्राईज या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये एकूण 20 ते 25 कामगार काम करतात. एकावेळी 10 कामगार कंपनीत काम करत असतात. मध्यरात्री रात्रपाळीचे दहा कर्मचारी झोपेत असताना अचानक कंपनीला आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाटू लागल्यामुळे जाग आली. आग लागल्याचं निदर्शनास येताच आपला जीव वाचविण्यासाठी कंपनीच्या बाहेर जाऊ लागले. नेमकी बाहेर पडण्याच्या जागेवरच आग लागल्यानं कामगारांना बाहेर पडणं शक्य झालं नाही. परंतु, काही कामगार पत्रे उचकटून एका झाडाच्या मदतीनं बाहेर पडले. मात्र, त्यातील सहा जणांना बाहेर पडणं शक्य झालं नाही, त्यामुळं त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. नेमकी आग कशामुळं लागली, याची अद्याप खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. सर्व मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले असून, पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सुरु केला आहे.
प्रत्यक्षदर्शी कामगारानं दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या मिर्झापूर इथले हे कामगार असून यातील चार कामगारांना आपला जीव वाचवता आला. परंतु, कंपनीत अडकलेले सहा जण भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अजून दोन जण या सर्वांचा गुदमरुन मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांचासह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि आग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. ही घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली असून आग विझवण्यात तब्बल चार तासांचा कालावधी लागला.