मृत म्हशींची नुकसान भरपाई महावितरणकडून अदा

स्थानिक शेतकरी भायदे यांनी केली नाराजी व्यक्त

| आगरदांडा | वार्ताहर |

26 ऑगस्ट 2023 रोजी पी.के.मसाल यांच्या घराच्या मागील बाजूस मुरुड शहरातील स्थानिक शेतकरी जयकांत महादेव भायदे यांच्या चार म्हशी व एक गाय चरण्यासाठी गेलेल्या होती. त्यावेळी त्यांना विजच्या जींवत तारेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. महावितरणने त्यांना एक लाख 36 हजार रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई दिली आहे.

दरम्यान, याबाबत भायदे कुटुंबाने नाराजी व्यक्त केली आहे. पंचनामा अहवालात आम्ही चार लाख 40 हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्षात खूप कमी रक्कम देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्याच्या कालावधीत ही घटना घडली होती. दूध देणारी जनावरे मुर्त्युमुखी पडल्याने भायदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. सदर घटनेचा पंचनामा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला होता. शवविच्छेदन अहवाल प्राप्त करून महावितरणने आपली कार्यवाही सुरु केली होती.

महावितरणकडून खूप उशिरा नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, दुकानदार वेल्फेअर आसोशीएनचे अध्यक्ष जाहिद फकजी यांनी भायदे यांना लवकरात लवकर आर्थिक भरपाई मिळावी यासाठी अधीक्षक अभियंता पेण, उपकार्यकारी अभियंता मुरुड यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून महावितरणकडून भायदे यांच्या बँक खात्यामध्ये एक लाख 36 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे भायदे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत मुरुड महावितरणचे उपमुख्य कार्यकारी अभियंता कृष्णांत सूर्यवंशी यांनी सांगितले की, महावितरणच्या निकषानुसार भायदे यांच्या मृत जनावरांची भरपाई महावितरने लवकरात लवकर अदा केली आहे. सदरची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.

Exit mobile version