सुधागड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
राज्यात जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर केले आहे. परंतु, या तुटपुंजी मदतीच्या स्वरूपावर सुधागड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शासनाने जाहीर केलेल्या या विशेष पॅकेजनुसार रब्बी हंगामात प्रति हेक्टर 10 हजार रुपयांप्रमाणे (3 हेक्टर मर्यादेपर्यंत) राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत मदत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, हेक्टरी 10 हजार रुपये ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असून, खरीप हंगामात झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत ही मदत अपुरी आणि अन्यायकारक आहे. सुधागड तालुक्यातील शेतकरी महेश पोंगडे यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यासह सुधागड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे क्षेत्र काही गुंठ्यांच्या दरम्यान आहे. तसेच, खरीप हंगामात भात पिक नर्सरी पंचनामे झाल्यामुळे क्षेत्र नोंदणी कमी झाली आहे. त्यामुळे हेक्टर आधारित मदतीच्या गणनेत हे अल्प क्षेत्रधारक शेतकरी यांना गुंठेवारी नुसार प्रति गुंठा फक्त 100 रुपये मदत मिळणार असल्याचे या शासन निर्णयामध्ये दिसत आहे. त्यामुळे शासनाने याबाबत स्पष्टता द्यावी. वाढीव नुकसान भरपाईचा विचार करावा. तसेच, शासनाच्या मदत पॅकेजमध्ये लवचिकता, न्याय परिगणना आणि स्थानिक परिस्थितीचा विचार होणे अत्यावश्यक आहे, अन्यथा शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत जाईल, असा इशारा स्थानिक स्तरावरून दिला जात आहे.
अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे येथील शेतकरी शेती न विकता, ती ओसाड न ठेवता हिंमतीने शेती करत आहेत. त्यांना प्रति गुंठा 5 हजार नुकसान भरपाई देऊन त्यांना वर्षानूवर्षे शेती करण्यासाठी प्रोत्साहन भत्ता दिला पाहिजे.
महेश पोंगडे,
शेतकरी, सुधागड







