आमिष देऊन ग्राहकांची शिकार
| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरात सध्या बिल्डर लॉबीने आकर्षक जाहिरातींची आतषबाजी सुरू केली आहे. आजच बुक करा आपल्या हक्काचं घर आणि मिळवा आकर्षक बक्षिसे! अशा घोषणा देत स्कूटर, मोबाईल, भेटवस्तू आणि सवलतींच्या आमिषाने ग्राहकांना ओढले जात आहे. मात्र, या जाहिरातींच्या मागे ग्राहकांच्या विश्वासावर घाव घालणारा डाव लपला असल्याची चर्चा उरण शहरात चांगलीच रंगली आहे.
उरण येथील आनंदनगर परिसरात रुद्रा रियालिटी नावाच्या बिल्डर ग्रुपकडून 1 व 2 बीएचके घरांसाठी ‘उत्सव ऑफर’ची जाहिरात करण्यात आली आहे. आजच बुक करा आणि मिळवा खात्रीशीर भेटवस्तू! असा संदेश देत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि बांधकाम क्षेत्रातील जाणकारांच्या मते, बिल्डर लॉबी विविध आमिष दाखवून ग्राहकांना फसवते. प्रकल्पांची आवश्यक परवानग्या, दर्जा, रेरा मंजुरी, पूर्णत्व प्रमाणपत्र नसतानाही घरं विकली जातात. बक्षिसांच्या नादात लोक कर्जबाजारी होतात.
दरम्यान, उरणमध्ये रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर टॉवर उभारले जात आहेत. त्यामुळे जुन्या प्रकल्पांना बुकिंग मिळत नसल्याने बिल्डर लॉबीकडून बक्षिसांच्या आमिषाचा डाव खेळला जात आहे. याशिवाय, नजीक असलेल्या द्रोणागिरी नोडमध्ये रेल्वे स्थानक जवळ असल्याने तेथील सदनिकांना गुंतवणूकदार व ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच,उरणमधील स्थानिकांना नवीन सदनिकांची गरज भासत नसल्याने उरणमधील बिल्डरांना ग्राहक मिळविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्कूटर, मोबाईल, भेटवस्तू अशा बक्षिसांच्या नावाखाली प्रचाराचा मोठा गाजावाजा सुरू आहे.





