| चिरनेर | प्रतिनिधी |
यंदा ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नोव्हेंबर महिना उगवला तरी अजूनही पाऊस बरसत आहे. या बरसणाऱ्या पावसामुळे भात शेतीबरोबरच कडधान्य व आंबा पिकांचेही नुकसान होणार असल्याने, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अजून खरिपातील शेतकऱ्यांचे भाताचे एकमेव नगदी पीक घरी आले नाही. रब्बी पिकेही यावर्षी बेभरोशाची झाली आहेत. या अवकाळीच्या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला आहे. भातपिके पाण्यात भिजून त्यापासून मिळणारा पेंढासुद्धा उन्हाळ्यात गुरांच्या चाऱ्यासाठी उपयोगी येणार नाही. अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. या ऋतुचक्रातील अस्थिरतेमुळे कोकणातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून, कष्टाने पिकविलेल्या पिकांचा चिखल झाला असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती झाली आहे. या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने मदतीची पावले उचलावीत आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी (दि.3) जिल्हाधिकारी किशन जावळे यांना देण्यात आले आहे.
या निवेदनातून रायगड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच, भातपीक व आंबापिक विम्याच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, अशा मागण्या शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आल्या आहेत. यावेळी शेतकरी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल खारपाटील, उपाध्यक्ष सज्जन पवार, महाराष्ट्र राज्य समितीचे सदस्य संतोष देवकर, अनंत भोईर, बळीराम म्हात्रे, सागर सागडे, ज्ञानदेव पवार, विश्वास पवार, सचिन गावंड तसेच अन्य कृषीभूषण शेतकरी उपस्थित होते.





