मृतास दोन लाख, तर गंभीर जखमीस मिळणार 50 हजारांची मदत
1 एप्रिल 2022 पासून लागू होणार
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशभरात रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसागणिक वाढतेच आहे. यातही जीवघेण्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवून पादचार्याला धडक देऊन पळून जाण्याचे प्रकारही सातत्याने वाढत आहे. अशा अपघातात निरपराधी पादचार्यांचे हकनाक बळी जात आहेत, मोठ्या प्रमाणावर लोक जखमी होत आहेत. अपघातातील मृत्यू पडणार्या पादचार्यांचे कुटुंबीय किंवा गंभीर जखमींना पुरेशी आर्थिक मदत मिळत नाही. या वस्तुस्थितीची गंभीर दखल घेत केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडणार्या रहिवाशांच्या कुटुंबियांना 8 पटीने अधिक भरपाई दिली जाणार आहे. अर्थात या भरपाईची रक्कम आता 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. अपघातातील गंभीर जखमी झालेल्यांना 12,500 ऐवजी 50 हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या नव्या योजनेचे नाव ‘हिट अँड रन मोटर अपघातातील बळींची भरपाई योजना, 2022’ असे असणार असून ही योजना 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे. मंत्रालयाकडून 25 फेब्रुवारी 2022 रोजी ‘हिट अँड रन’ रस्ते अपघातातील पीडितांना भरपाई देण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये नुकसानभरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. गंभीर जखमींसाठी भरपाईची रक्कम वाढवून 50,000 रुपये करण्यात आली आहे, तर मृत्यूच्या बाबतीत सध्याच्या 25,000 रुपयांवरून 2,00,000 लाख रुपये अशी भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. 1 एप्रिल 2022 पासून ही नवी योजना जुन्या ‘भरपाई योजना, 1989 ची जागा घेईल. नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्यासाठी व पीडितांना पैसे देण्यासाठीही मुदत निश्चित करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्रालयाने मोटार वाहन अपघात कायदा निधीशी संबंधित नियमही निश्चित केले आहेत. या निधीतून हिट अँड रन अपघातातील जखमींना उपचारासाठी तसेच इतर मदत केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत रस्ते अपघातांची सखोल चौकशी करण्याची प्रक्रिया असणार आहे. अपघातांचा तपशीलवार अहवाल आणि दाव्यांचा जलद निपटारा यासाठीही तरतूद आहे.
‘हिट अँड रन’प्रकरणी मिळणार अधिक भरपाई; मृताच्या कुटुंबियांना केंद्राचा दिलासा
