तालुक्यात भात, नाचणी पिकांसाठी स्पर्धा

पिक जोमात वाढवा, मालामाल व्हा!

। नेरळ । प्रतिनिधी ।

राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध ठिकाणी प्रयोगशील शेतकर्‍यांकडून वेगवेगळे प्रयोग करून उत्पादन वाढविण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकर्‍यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

दरवर्षी कृषी विभागाकडून कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकर्‍यांचे योगदान मिळेल, तसेच त्याचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकर्‍यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा एकमेव उद्देश ठेवून खरीप हंगामात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरीय स्पर्धा ठेवली आहे. रायगड जिल्ह्यातही स्पर्धा होणार असून यात भात, नाचणी (रागी) आणि वरी या पिकांचा समावेश आहे. या पिकांसाठी पीकस्पर्धा तालुका आणि जिल्हा तसेच राज्य पातळीवर आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्जासोबत प्रवेश शुल्क भरण्याचे चलन, सातबारा, 8/अ चा उतारा, संबंधित सातबारावरील जाहीर केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते, चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडाण्याचे आावाहन कृषी विभागाने केले आहे.

ही स्पर्धा तालुका तसेच जिल्हा स्तरावर होणार आहे. आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन उत्पादकता आधारभूत धरून विजेता निवडणार आहेत. अन्नधान्य, कडधान्याची पीक स्पर्धा आयोजित पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी पीक स्पर्धा घेण्यात येत आहे. यात भात व नाचणी (रागी) या पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. शेतकर्‍याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसणे आवश्यक असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट पर्यंत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच, अर्ज नोंदणीसाठी आणि पीक स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, सचिन केणे यांनी आपल्या जवळच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधण्याचे आवाहन कर्जत तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.

Exit mobile version