तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ याचे प्रतिपादन
| कोर्लई | वार्ताहर |
शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या खरीप हंगाम सन 2023 या पिकस्पर्धा योजनेत मुरुड तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी केले आहे. तालुक्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात या पिकासाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची भात या पिकांसाठी अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. प्रवेश शुल्क सर्वसाधारणगटासाठी रक्कम रु.300 व आदिवासी गटासाठी रक्कम रु. 150 राहिल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.