विद्यार्थ्यांकडून निर्माल्याचे संकलन

| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अनंत चतुर्दशीच्या विसर्जन सोहळ्यात भक्तांनी आणलेले निर्माल्य संकलन करण्याचे काम केले. 40 विद्यार्थ्यांनी साधारण 15 टन निर्माल्य संकलन करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना मदत केली.

अनंत चतुर्दशीनिमित्ताने गणपती विसर्जन सोहळा नेरळ ग्रामपंचायतीकडून येथील गणेश घाटावर आयोजित केला जातो. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने निर्माल्य संकलनासाठी नेरळ ग्रामपंचायतला मदत केली.नेरळ गणेश घाटावर विसर्जनासाठी येणार्‍या गणेश मूर्ती आणि त्या भक्तांसोबत असलेले निर्माल्य हे विद्यार्थी घेवून निर्माल्य कलशात साठवून ठेवत होते.तर काही विद्यार्थी त्याबाबत भक्तांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत होते. नेरळ महाविद्यालय मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या 40 विद्यार्थ्यांच्या टीमने तब्बल 15 टन निर्माल्य संकलन करण्याचे काम केले. नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी निर्माल्य धरणाच्या पाण्यात कोणीही भक्त टाकणार नाही याची काळजी घेत होते. त्यामुळें धरणाच्या पाण्यात यावेळी कोणत्याही प्रकारचे निर्माल्य वाहून जाताना दिसले नाही.

निर्माल्य संकलन कार्यक्रमाची संकल्पना महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे यांनी राबविली असून, त्याचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. सोनम गुप्ता, राष्ट्रीय सेवा योजना विभाग सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अनंत घरत यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या निर्माल्य संकलनाबद्दल नेरळ सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर तसेच सर्व सदस्यांनी कौतुक केले.

Exit mobile version