। नागोठणे । वार्ताहर ।
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्याकडून रायगड जिल्ह्यात सर्वत्र पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गणेश विसर्जन स्थळी निर्माल्य कलशामध्ये जमा करण्याचे अभियान राबविण्यात आले. याचाच एक भाग म्हणून नागोठणे शहर व परिसरांतही दिड दिवस, पाच दिवस व अनंत चतुर्दशी गणपतींच्या विसर्जन स्थळी सुमारे चार टन निर्माल्य जमा करण्याचा स्तुत्य उपक्रम नागोठण्यातील श्री सदस्यांकडून राबविण्यात आला.
नागोठणे शहरातील आंबा नदीच्या किनारी असलेल्या विसर्जन घाटावर तसेच शृंगार तलाव, वरवठणे, वेलशेत, गांधे, चोळे आदी ठिकाणच्या गणेश विसर्जन स्थळांवर श्री सदस्यांकडून निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. हे जमा झालेले सर्व निर्माल्य त्यामधील प्लास्टिक बाजूला करून नगोठण्यातील अंबा घाटा लगतच असलेल्या जागेत एका खोल खड्ड्यात साठऊन बुजविण्यात आले आहे. नंतर या निर्माल्याचा डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून परिसरांत लावण्यात आलेल्या वृक्षांसाठी खत म्हणून वापर करण्यात येणार असल्याचे श्री सदस्यांनी सांगितले.







