। पनवेल । वार्ताहर ।
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ट्रक चालकाला लुटणार्या पाच दरोडेखोरांना पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच मोबाईल फोन आणि सात हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. रोहन उर्फ गुड्डू गोपीनाथ नाईक (24), रोहिदास सुरेश पवार (23), आतेश रोहिदास वाघमारे (26), मनीष काळूराम वाघमारे (35), शंकर चंदर वाघमारे (18), सर्व राहणार निंबोडेवाडी, खालापूर अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ट्रकवरील चालक गेंदलाल पटेल हा लघुशंकेसाठी पळस्पे हायवे पोलीस चौकीच्या 200 मीटर पुढे थांबला असताना चोरट्यांनी 9 सप्टेंबर रोजी त्याला हाता-बुक्कयांनी मारहाण करून धमकावले आणि मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गीजे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, विजय देवरे, सुनील कुदळे, महेश धुमाळ, शिवाजी बाबर, सतीश तांडेल, राजकुमार सोनकांबळे, आकाश भगत, भीमराव खताळ, वैभव शिंदे, प्रवीण पाटील यांनी या गुन्ह्यातील आठ आरोपींपैकी पाच आरोपींना अटक केली. या गुन्ह्यातील आणखी तीन आरोपींचा शोध सुरू आहे. यातील रोहन उर्फ गुड्डू गोपीनाथ नाईक हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे दोन, खालापूर येथे एक जबरी चोरी आणि दरोड्याचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील आरोपी हे दिवसा अन्य ठिकाणी नोकरी करायचे आणि रात्री मौजमजेसाठी एक्सप्रेस हायवेवर नागरिकांना लुटायचे अशी माहिती पोलिसांनी दिली.