| रोहा | वार्ताहर |
तालुक्यातील तळाघर ग्रामपंचायत हद्दीतील वैशाली नगर बौद्धवाडी येथे दोन दिवसापूर्वी एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला होता. स्मशानभूमी असणार्या
ठिकाणी जाण्यासाठी नदीवर पुल नाही. त्यामुळे वयोवृध्दाची अंत्ययात्रा गुडघाभर पाण्यातून नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. देश स्वतंत्र होऊ 75 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र, ग्रामीण भागांमध्ये अद्यापही अशीच भयावय स्थिती पहायला मिळते. सरकार आणि प्रशासन नेमका कोणता विकास साधतात हा खरा प्रश्न आहे.
वैशाली नगर येथील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मृत्यूनंतर शेवटचा प्रवास देखील सुखकर राहिलेला नाही. मृत्यू झालेल्या वयोवृद्धाच्या नातेवाईकांना या पाण्यातून वाट काढत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागला. त्यामुळे या वयोवृद्धाला शेवटचा प्रवास मरण यातना सहन करणारा ठरला.
स्मशानात जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात खुप मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होत आहेत. तसे वैशाली नगर बौद्धवाडीची लोकवस्ती 50 ते 60 लोकसंख्या आहे. फक्त या वाडीचा राजकीय मंडळी मतांसाठी वापर करतात. मात्र, लोकांच्या गैरसोयींकडे लक्ष द्यायला वेळ नाही हे दुर्दैव आहे. गेल्या अनेक वर्ष ग्रामपंचायतकडे या संदर्भात मागणी केली असता अद्याप पूल मात्र बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे लवकरात लवकर नागरिकांची गैरसोय होऊ नये. त्यासाठी ग्रामपंचायत किंवा लोकप्रतिनिधीने हा पूल बांधून द्यावा, अशी मागणी तळाघर वैशाली नगर बौद्ध वाडीचे रहिवासी प्रमोद गायकवाड यांनी केली आहे.