मानवनिर्मित पूरस्थितीची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यात गेल्या चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक गावांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीला मानवनिर्मित कारणे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत चिरनेर येथील अनंत नारंगीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे. तसेच, या प्रकरणी संबंधित महसूल, वन व ग्रामपंचायत प्रशासनातील अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.

अनंत नारंगीकर यांनी अर्जात नमूद केले आहे की, उरण तालुक्यातील पूरस्थितीबाबत त्यांनी यापूर्वी दि.23 फेब्रुवारी रोजी वृत्तपत्रांतील बातम्यांच्या आधारे मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने संबंधित प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले होते. मात्र, उरणच्या तहसीलदारांकडे याबाबत विचारणा करूनही कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, दि. 4 व 5 जुलै रोजी उरणच्या ग्रामीण भागातील गावांमध्ये शिरून नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याचे बोलके चित्र. यावेळी वेश्वी, चिर्ले, कळंबूसरे, चिरनेर, दिघोडे, विंधणे, धुतूम, पौंडखार, बेलोंडेखार, कोप्रोली, पिरकोन, सारडे, वशेणी, बांधपाडा, जासई व भेंडखळ यांसह अनेक गावांमध्ये विकासकांनी केलेल्या दगड, माती, मुरूम व डेब्रिजच्या मोठ्या भरावामुळे नैसर्गिक पाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. परिणामी मानवनिर्मित पूरस्थिती निर्माण होऊन अनेक घरांमध्ये पाणी शिरले आणि नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अर्जात करण्यात आला आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील पूरस्थितीची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशी मानवनिर्मित आपत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या तक्रार अर्जाद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

Exit mobile version