शिक्षण उपसंचालकांकडे मुख्याध्यापकाची तक्रार

। पेण। वार्ताहार।
सागर शिक्षण मंडळ वाशीच्या ए.टी.पाटील विद्यालयामध्ये रमेश इंगळे हे गेली 27 वर्ष गणिताचे शिक्षक म्हणून काम करत आहेत. परंतु गेली 5 वर्ष त्यांना मुख्यध्यापकांकडून मानसिक त्रास होत असल्याची तक्रार रमेश इंगळे यांची पत्नी मंदा इंगळे यांनी शिक्षण उपसंचालक मुंबई यांच्याकडे तक्रारी अर्ज केला आहे.
या तक्रारी अर्जामध्ये मुख्याध्यापक मुलांच्या समोर शिक्षक रमेश इंगळे यांना अपमानित करत असल्याचे म्हटले आहे. परंतु कशा प्रकारे अपमानित करतात या बद्दल काहीही तक्रारी अर्जात माहिती दिलेले नाही. मात्र अपमान झाल्यामुळे रमेश इंगळे यांच्यावर मानसिक परिणाम होत असल्याचे देखील म्हटले आहे. तसेच ऑगस्ट महिन्याचा वेतन अडवल्याचे देखील म्हटले आहे. सदरची कैफियत संस्था अध्यक्षांकडे व शिक्षण अधिकारी अलिबाग यांच्याकडे लेखी स्वरूपात दिल्याचे म्हटले आहे. तरी याबाबत न्याय मिळावा, अशी आपल्या तक्रारी अर्जात मागणी केली आहे.
सदर प्रकाराबाबत शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपल्याकडे आलेल्या तक्रारी अर्जाची दखल घेउन चौकशीसाठी पुढे पाठविले असल्याचे सांगितले. तसेच मुख्याध्यापक एस.एच.पाटील यांच्याशी संपर्क करून सदरील प्रकाराबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, इंगळे सर हे माझे सहकारी आहेत. माझ्या सहकायार्ंना त्रास देऊन मला काय फायदा होणार आहे. माझा आणि त्यांचा कोणताही वाद नाही. गेले कित्येक वर्ष आम्ही गुण्या गोविंदयाने एकत्र काम करत आहोत. मात्र सध्या इंगळे सरांची मानसिक स्थिती योग्य नाही. मी त्यांना वैद्यकीय सल्ला घेण्याचे देखील सांगितले आहे. तसेच दोन महिन्यापुर्वी इंगळे सर रजा मंजुर नसताना 28 दिवस रजेवर गेले. त्यामुळे त्यांचा वेतन थांबवावा लागला. जर माझ्या विरूध्द तक्रार केली असेल तर ती पुर्णतः चुकीची व खोटी आहे. होणार्‍या चौकशीला मी सामोरे जायला तयार आहे. चौकशी झाल्यास इंगळे सरांची मानसिक स्थिती काय आहे व ते विदयार्थ्यांंसमोर कशाप्रकारे वागतात हे समोर येईल.

Exit mobile version