| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलमधील मिडल क्लास सोसायटीतील कनक लक्ष्मी गृह निर्माण संस्थेतील एका सदनिकेत बेकायदेशीर काम सुरु असल्याची तक्रार पनवेल महानगरपालिका तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेत दाखल झाल्याने खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या इमारती मधील विकास डोळे यांनी त्यांच्या मालकीच्या सदनिकेची विक्री केली. ही सदनिका घेणाऱ्याने अजूनही संस्थेचे रीतसर भागधारक म्हणून स्वतःची नोंद देखील केलेली नसून या जागेचा व्यावसायिक वापर करण्याची त्यांची योजना आहे. मात्र, रहिवासी इमारत असल्याने असे करणे कायदेशीर नसून संस्था संचालक समितीने देखील त्यांना असे करण्याची परवानगी दिलेली नाही. तसेच, इमारत जुनी असल्यामुळे दुरुस्ती करतांना तोडफोड करू नये, असे देखील सांगण्यात आले होते. मात्र, नव्या सदनिका खरेदीदाराने मनमर्जी करत येथे तोडफोड सुरु केली आहे. तसेच, परीक्षेचा कालावधी असल्याने याचा त्रास विध्यार्थ्यांसह रहिवासीयांना होत आहे. त्यामुळे याप्रकरणी कनक लक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्याकडून महानगरपालिका आयुक्त कार्यालयात तसेच सहाय्यक निबंधक यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आल्या आहेत. यावर काय कार्यवाही होणार, याकडे पनवेकरांचे लक्ष लागले आहे.