आपत्ती व्यवस्थापन विशेष प्रशिक्षण पूर्ण

। उरण । वार्ताहर ।
ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे वतीने मधुसूदन दास अकॅडमी ऑफ फायनान्सिंयल मॅनेजमेंट, भुवनेश्‍वर या संस्थेत चक्रीवादळ सौमिकरण व पूर्वतयारी बाबतचे विशेष प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यावेळी रायगड जिल्ह्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी 15 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत विशेष आपत्ती व्यवस्थापण प्रशिक्षण पूर्ण केले. जिल्ह्याने मागील काही वर्षात निसर्ग, तौक्ते अशा प्रकारची विविध वादळे व अतिवृष्टी, दरड कोसळणे यासारखी नैसर्गिक संकटे अनुभवली आहेत. याचा विचार करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांना चक्रीवादळ सौमिकरण व पूर्वतयारी अंतर्गत प्रशिक्षणाची असलेली गरज ओळखून जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याबाबतचे नियोजन केले. त्यानुसार त्यांनी रायगड जिल्ह्यातील महसूल, पोलीस, ग्राम विकास विभागाच्या 50 अधिकारी/कर्मचार्‍यांना मधुसूदन दास अकॅडमी ऑफ फायनान्सिंयल मॅनेजमेंट, भुवनेश्‍वर, ओरिसा येथे चक्रीवादळ सौम्यीकरण व पूर्वतयारी या विषयावरील आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणासाठी पाठविले होते.


या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील महसूल विभाग- 7, पोलीस विभाग- 10 पोलीस अधिकारी व 10 पोलीस कर्मचारी, 15 होमगार्डस् , श्रीवर्धन सरपंच 1, घारापुरी उरण सरपंच 1, ग्रामविकास विभाग-6 असे एकूण 50 अधिकारी-कर्मचारी व इतर सहभागी झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी 50-50 च्या दोन पथकांना येणार्‍या पुढील कालावधीत प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासनाच्या विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचा, आपत्ती व्यवस्थापनाचे काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांचा समावेश केला जाणार आहे.

Exit mobile version