विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा-बारणे

। अलिबाग । प्रतिनिधी ।
सर्वसामान्य गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे, हा त्यांचा हक्क आहे. त्यांना हा हक्क मिळवून देणे हे शासकीय अधिकार्‍याचे कर्तव्य आहे. यानुषंगाने जिल्ह्यात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सुरू असलेली सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व विभागाच्या खातेप्रमुखांना मंगळवारी (24 मे) अलिबाग येथे केल्या.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक समिती अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध योजनांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी खा.सुनील तटकरे, सर्वश्री आ भरत गोगावले, रविंद्र पाटील, आ.महेंद्र थोरवे, आ.महेश बालदी, जि.प. सदस्य चंद्रकांत कळंबे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जि.प.सीईओ डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपवनसंरक्षक (अलिबाग) आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक (रोहा) आप्पासाहेब निकत, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्यासह समिती सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य व शासकीय विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातंर्गत रस्ते तसेच महामार्गाच्या कामांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा कराव्यात, कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत सर्व कामे प्राधान्याने विहीत मुदतीत पूर्ण करावीत, नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात असलेल्या शहरे व ग्रामपंचायत हद्दीत सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवावेत, जिल्ह्यात शेतकरी, ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत सर्व मूलभूत सोयीसुविधा गुणवत्तापूर्ण उपलब्ध करुन द्याव्यात, सिंचन विषयक सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, यासह इतर सूचना संबंधित अधिकार्‍यांना करण्यात आल्या. सूत्रसंचालन जिल्हा परिषद पाणी व पुरवठा विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले.

Exit mobile version