जिल्हा न्यायालयाने ठोठावली शिक्षा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
उसणे घेतलेले पैसे परत द्यावे लागू नये या हेतूने महिलेचा ओढणीने गळा आवळून हत्या करणार्या गणेश शंकर म्हात्रे याला जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश विभा इंगळे यांनी जन्मठेप आणि 10 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
भाग्यश्री आण्णाप्पा पवार रा. इंदापूर, ता माणगाव असे मयत असलेल्या महिलेचे नाव असून हा गुन्हा 14 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मौजे परमानंदवाडी दादर, ता. पेण येथे मतखार कोठा नावाचे कांदळवनाचे येथे घडला. आरोपी गणेश शंकर म्हात्रे याने भाग्यश्री पवार हिला इंदापूर येथून वडखळ येथे फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर आपल्या बजाज मोटारसायकलवर बसवून मुंबई गोवा महामार्गावरून हमरापुर फाटा मार्गे दादर परमानंदवाडी येथे तिच्याकडून घेतलेली रक्कम तिला परत करण्याचे बहाण्याने मतखार कोठा या कांदळवनाजवळ नेले. त्यानंतर तिचा ओढणीने गळा आवळुन ठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह खाडीकिनारी कांदळवनमध्ये टाकून दिले. तसेच तिचा मोबाईल देखील खाडीत फेकून नष्ट केला.
याबाबत विजय भानुदास पाटील यांनी दादर सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात तपासात आरोपी गणेश म्हात्रे हा दि. 13 एप्रिल 2018 रोजी मयत महिले बरोबर सकाळी तीचा मृत्यू होईपर्यंत संध्याकाळी 05.00 वाजेपर्यंत कायम संपर्कात होता हे सिद्ध झाले. तसेच आरोपी तिला वडखळ येथून परवानंदवाडी येथे त्याच्या – मोटारसायकलवर घेवून जातानाचे सीसीटिव्ही फुटेज पोलीसांना तपासादरम्यान मिळून आले. सदर सीसीटिव्ही फुटेज मधील दोनही व्यक्ती या मयत व आरोपी असल्याबाबतचा पुरावा शास्त्रीय तज्ञ विजया वसंत कुडाळ यांनी सिद्ध केले. सरकारी अभियोक्ता अॅड भुषण साळवी यांनी प्रभावीपणे सदरचा मांडलेला पुरावा न्यायालयाने ग्राहय धरुन सदर आरोपीस शिक्षा ठोठावली. त्यानुसार न्यायालयाने आरोपी गणेश शंकर म्हात्रे यास भा. दं. वि. कलम 302 प्रमाणे दोषी पकडून जन्मठेपेची शिक्षा व रक्कम रुपये 10 हजार तसेच, तसेच भा. दं. वि. कलम 201 प्रमाणे दोन वर्षाची साधी कैद व रक्कम रुपये 1 हजार दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्यात शासकीय अभियोक्ता अॅड भुषण साळवी यांनी 23 साक्षीदार तपासून दमदार युक्तिवाद केला.







