अपुर्ण मोरीचे काम पूर्ण करा: संदीप चिरायु

। कोर्लई । वार्ताहर ।

पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे घडणारे प्रकार लक्षात घेऊन मुरुड तालुक्यातील बोर्ली नाक्यावरील नालेसफाईची कामे पूर्ण करण्यात येऊन नवीन बांधलेल्या दोन मोर्‍या सुरू करण्यात याव्यात तसेच अपुर्ण मोरीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी संदीप चिरायु यांनी केली आहे. याबाबतचे एक निवेदन त्यांनी बोर्ली ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना दिले.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुकाना समोरच नवीन नाल्याचे काम मागच्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. पावसाळा सुरू झाला तरी अजून ते काम पूर्ण झालेले नाही. त्या नाल्याचे पाणी समुद्राच्या खाडीमध्ये सोडण्यासाठी नवीन दोन मोर्‍या बांधण्यात आल्या होत्या, पण काही कारणास्तव त्या बंद केल्या आहेत. त्या अती तातडीने सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. दोन्ही मार्‍या सुरु केल्या नाहीत तर आमच्या व्यापार्‍यांवर पुराचे मोठे संकट निर्माण होईल व होणार्‍या नुकसानास आपल्याला जबाबदार धरण्यात येईल. आमचे नुकसान झाल्यास आम्ही सर्व व्यापारी आपल्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा देखील निवेदनाद्वारे दिला आहे.

दरम्यान, सदर निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version