मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश
। मुंबई । प्रतिनिधी ।
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणार्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांच्या दुरस्तीचे काम 25 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत.
सध्या या महामार्गावर खड्डे भरण आणि दुरस्तीची कामे कंत्राटदारांकडून सुरू आहेत. ही कामे अधिक जलदगतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कंत्राटदारांकडून आणि पूर्ण ताकदीने युद्धपातळीवर काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, खासदार सुनील तटकरे, विनायक राऊत आ. प्रवीण दरेकर, भरत गोगवले, नितेश राणे, वैभव नाईक, राजन तेली, योगेश कदम, रविशेट पाटील, शेखर निकम, किरण पावसकर, राजन साळवी, अनिकेत तटकरे, आदिती तटकरे आदी उपस्थित होते.
दुरस्तीसंदर्भात उपस्थित सर्व आमदार आणि खासदार यांनी आपापल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या असून या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावर तात्काळ आणि जलदगतीने निर्णय घेऊन काम करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या.
कंत्राटदारांच्या कामावर नजर
संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीतजास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही वाहतूक विभागाला देण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ज्या-ज्या कंत्राटदारांकडे देण्यात आली आहे, त्यांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील एक अभियंता नेमून या दोघांचीही नावे शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.
