रखडलेला वेतनकरार संपन्न

। उरण । वार्ताहर ।

उरणच्या जेएनपीटी बंदर परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांच्या माध्यमातून सकारात्मक दबाव निर्माण करणारे द्रोणागिरी जनरल कामगार युनियनचे कामगार नेते रवी घरत यांचा दणकाच भारी असल्याचा प्रत्यय येथील आयएमसी कंपनी अंतर्गत एस पी एंटरप्रायजेसमध्ये काम करणार्‍या कामगारांना आला आहे. गेली काही वर्षे रखडलेला वेतनकरार असिस्टंट लेबर कमिशनर कार्यालयात संपन्न करून देण्याची किमया रवी घरत यांनी दाखविली आहे. तब्बल 8 हजार रुपायांच्या भरघोस पगारवाढीसह कामगार कायद्यानुसार कामगारांना देणे कंपन्यांवर बंधनकारक आहे, अशा अनेक सेवा सुविधा कामगारांना देण्याचे या निमित्ताने मान्य करण्यात आले आहे.

या शिवाय प्रत्येक कामगार आणि कुटुंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी तसेच रुग्णाला तत्काळ हॉस्पिटल डिपॉझिटसाठी आर्थिक सहाय्य कर्ज, विविध रजा मंजूर, फेस्टिव्हल ऍडव्हान्स, एलटीए ऍडव्हान्स अशा सुखमय सुविधा उपलब्ध करून देऊन येथील कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. असिस्टंट लेबर कमिशनर कार्यालयात अंतिम स्वरूप देण्यात आलेला हा वेतनकरार डेप्युटी कमिशनर वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आयएमसी प्रशासनाच्यावतीने सरतेज यादव, नेहरू, नवले आणि लेले तर कंपनी मालक धर्ती घरत, उमेश म्हात्रे आणि कामगार प्रतिनिधी विशाल गावंड व कुणाल पाटील युनिटचे सचिन ठाकूर, रमेश तांडेल, प्रीतम ठाकूर, विनायक घरत, किशोर ठाकूर आदी उपस्थित होते.

Exit mobile version