। नेरळ । प्रतिनिधी ।
उत्तरप्रदेश मधील लखीमपूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील तीन पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. सोमवारी सकाळ पासून कर्जत शहर आणि तालुक्यातील बाजारपेठा ठप्प झाल्या होत्या. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या तसेच शेतकरी कामगार पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यापारी वर्गाला आवाहन केल्यानंतर बंदला कर्जत तालुक्यात सकाळच्या वेळी उत्स्फूर्त तर दुपारनंतर संमिश्र प्रतिसाद मिळाला.
लखीमपूर येथील घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी कर्जत तालुक्यात बंद पाळण्यात आला. या महाराष्ट्र बंदमध्ये कर्जत तालुक्यातील व्यवहार अर्धा दिवसाच्या बंद नंतर पुन्हा खुले झाले. कर्जत तालुक्यात कर्जत शहरात तसेच दहिवली येथील बाजारपेठ याशिवाय नेरळ आणि माथेरान येथिल बाजारपेठ सकाळी बंद होत्या. तर तालुक्यातील ग्रामीण भागातील डिकसळ, कळंब, पाडाव आणि कशेळे येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. कर्जत शहरात राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने बंदसाठी बाईक रॅली काढून बंद यशस्वी केला. त्यावेळी काँग्रेस पक्षच तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे, माजी नागरध्यक्ष धनंजय चाचड यांच्यसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्ये रॅलीत सहभागी झाले होते.