प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ अलिबागमधून; जिल्ह्यात एकूण 72 प्रशिक्षण सत्रांचे आयोजन
| अलिबाग | प्रतिनिधी |
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ‘सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा अभियान’ राज्यभर राबवविण्यात येत आहे. या अंतर्गत रायगड जिल्ह्यात एकूण 72 प्रशिक्षण सत्र घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग तालुक्यातून करण्यात आला. यावेळी अलिबागमध्ये सात प्रशिक्षण सत्रे घेण्यात आली. त्यानंतर उरण तालुक्यात सत्र घेण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौशल्य व कार्यक्षमता उंचावणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू आहे.
आयुष्मान आरोग्य मंदिर, उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आणि आशा कार्यकत्र्यांच्या माध्यमातून ही सेवा थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवली जाते. गावात माता व बालमृत्यू दर शून्य ठेवणे, टी.बी., उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांचे वेळेत स्क्रिनिंग करणे आणि गृहभेटी, आरोग्य सत्रे आयोजित करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अलिबागमध्ये सात सत्रे घेण्यात आली. त्यानंतर उरण तालुक्यात चार सत्रे होणार आहेत. तसेच, पेण 5, म्हसळा 2, महाड 6, मुरूड 3, खालापूर 4, कर्जत 8, रोहा 6, सुधागड 3, श्रीवर्धन 2, माणगाव 6, पोलादपूर 2, पनवेल 9, तळा 2 अशी एकूण 72 प्रशिक्षण सत्रे घेण्यात येणार आहे. ही प्रशिक्षण सत्रे रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयेश गोसावी, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.दामोदर मोरे, जिल्हा प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहेत.
13 मूलभूत घटकांवर मार्गदर्शन
गरोदरपण, प्रसूती व प्रसूतीपश्चात काळजी, 2. नवजात व अर्भक आरोग्य सेवा, 3. बालक व किशोरवयीन आरोग्य, 4. कुटुंब नियोजन व प्रजनन आरोग्य, 5. संसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, 6. सामान्य व किरकोळ आजारांवर उपचार, 7. असंसर्गजन्य आजारांचे नियंत्रण, 8. डोळे व कान यांचे प्राथमिक आरोग्य, 9. दातांची स्वच्छता, मुखाच्या कर्करोगाची तपासणी आणि तंबाखूमुक्तीसाठी जनजागृती, 10. वृद्धापकाळ व पॅलिएटिव्ह केअर, 11. आपत्कालीन वैद्यकीय सेवा, 12. मानसिक आरोग्य सेवा, 13. योग व आयुष पद्धती.







