| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
केंद्र व राज्य शासन पुरस्कृत कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी संगणक प्रचालक गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना मानधन दिले नसल्याची माहिती समोर येत आहे. संगणक प्रचालकर मानधनाविना काम करीत असल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, राज्य पुरस्कृत नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शासनाने सुरू केली. या योजनेअंतर्गत ऑनलाईन कामे गतीमान व्हावी म्हणून जिल्ह्यात संगणक प्रचालकांची नियुक्ती केली. कोकण विभागात 60 हून अधिक प्रचालक असून, रायगड जिल्ह्यात 16 जणांचा समावेश आहे. कंत्राटी स्वरुपात नेमण्यात आलेल्या या प्रचालकांमार्फत योजनांची कामे करून घेण्यात आली. परंतु, एप्रिल महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे मानधनच दिले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अशा अनेक कृषी विषयक योजनांची कामे सुरुळीत सुरु आहेत. या कर्मचाऱ्यांमार्फत ही कामे केली जात आहेत. मागील सहा महिन्यांपासून मानधन दिले नसल्याने या प्रचालकांची आर्थिक कुचंबना होऊ लागली आहे. त्यांच्यावर मानसिक परिणाम होत आहे. हे कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील पंधरा दिवसापुर्वी गणेशोत्सव जिल्ह्यात साजरा झाला. या सणासूदीच्या काळातही त्यांना मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. अखेर या कर्मचाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कृषी विभागाकडे निवेदन दिले आहे. मानधन लवकरात लवकर देण्यात यावे. मानधनासाठी लागणारा निधी वित्त विभागाकडून मंजूर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मागील एप्रिल महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे महिन्याचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर मानधन द्यावे अशी मागणी होत आहे. याबाबत कोणक विभागातील कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
संगणक प्रचालक
(नाव न सांगण्याच्या अटीवरून)







