संगणक परिचालकांचे शिवतीर्थावर ठिया आंदोलन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या संगणक परिचालकांच्या मानधनाबाबत इन्व्हाईस क्लेमची लावलेली जाचक अट परिचालकांसाठी डोकेदुखी बनली आहे. याबाबत अनेकवेळा सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातच बसून ठिय्या आंदोलन करीत निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष मयुर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात सचिव निवेदिता चवरकर, सर्वेश रसाळ, आदी पदाधिकार्‍यांसह 275 संगणक परिचालक सहभागी झाले होते.
ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये काम करणार्‍या संगणक परीचालकांवर सीएससी – एसपीव्ही या कंपनीकडून वेळोवेळी अन्याय होत असल्याचा आरोप संगणक परिचालकांनी केली आहे. शासनाच्या योजनांचे काम प्रामाणिकपणे
करूनदेखील संगणक परिचालकांना त्यांच्या कामाचा मोबदला देखील वेळेत मिळत नाही. गेल्या तीन महिन्यांपासून या परिचालकांना मानधन मिळाले नाही. जे मानधन मिळते त्यासाठी दर महिन्याला त्यांना जे इन्व्हाईस क्लेम करावे लागत आहे. त्यासाठी कंपनीकडून जाचक अट लावली आहे. त्यामुळे संगणक परिचालकांना हक्काच्या मानधनाला मुकावे लागण्याची भिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे रायगड जिल्हयातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणार्‍या संगणक परिचालकांनी बुधवारी अलिबाग येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात घुसून ठिया आंदोलन सुरु केले आहे. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सर्व परिचालकांनी ठिय्या आंदोलन करण्यात सुरुवात केली आहे.

Exit mobile version