| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाला काही मंडळी सोडून गेली, तरी तळागाळातील कार्यकर्ता आजही पक्षासोबत निष्ठेने उभा आहे. कार्यकर्त्यांची हीच ताकद आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये एक वेगळे बळ देणार आहे. राज्यासह रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाला वातावरण चांगले आहे. त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रत्येकाने आतापासूनच कामाला लागा. पक्षाला बळकट करण्याबरोबरच उभारी देण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यामुळे प्रत्येकाने जिद्दीने कामाला लागा, असे आवाहन शेकापचे नेते माजी आ. बाळाराम पाटील यांनी केले.
शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा चिटणीस मंडळ, पदाधिकारी, सदस्य व तालुका चिटणीस यांची गुरुवारी (दि. 3) अलिबागमधील शेकाप भवनमधील सभागृहात सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये माजी आ. बाळाराम पाटील बोलत होते. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य मीडिया सेल अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे,शेकाप चिटणीस मंडळाचे खजिनदार अतुल म्हात्रे, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, नारायण घरत, तेजस्वीनी म्हात्रे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम, जिल्ह्यातील चिटणीस मंडळ, पदाधिकारी, सदस्य, तालुका चिटणीस आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बाळाराम पाटील यांनी सांगितले की, मागील महिन्याभरापासून शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी राज्यभर दौरा झाला. वेगवेगळ्या बैठका झाल्या. या बैठकांमधून कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सांगोलासह सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांतून हजारो कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले आहेत. शेकापसाठी एक चांगले वातावरण निर्माण झाले आहे. राज्यासह जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या समित्या निर्माण केल्या आहेत. या समित्यांना ॲक्टीव्ह करण्याचे काम वेगाने सुरु आहे. तरुणांसह ज्येष्ठ कार्यकर्त्यांना या समित्यांमध्ये घेऊन एक वेगळ्या भूमिकेतून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. जे.एम. म्हात्रे व इतर मंडळी सोडून गेल्याने पक्षावर काहीच परिणाम झाला नाही. आजही शेतकरी कामगार पक्षाचा नेता ताठ मानेने फिरत आहे. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. पक्षाची ध्येय धोरणे गावांसह शहरी भागात पोहोचवून पक्षाची भूमिका पटवून देण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे. आगामी काळात चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानुसार कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागले पाहिजे. या निवडणुकांमध्ये शेकापला चांगले यश मिळेल, असा विश्वास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील यांनी आभार व्यक्त केले.
समन्वय साधून काम करा : अतुल म्हात्रे
राज्यपातळीवर शेतकरी कामगार पक्षाच्या वेगवेगळ्या बैठका झाल्या. कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. आपल्या पक्षाची ताकद या निवडणुकीत दाखवून देण्याची गरज आहे. प्रत्येकाने आतापासूनच समन्वय साधून काम करायचे आहे. जोमाने काम करून पक्षाला उंच दिशा देण्यासाठी मेहनत घ्या, असे प्रतिपादन शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांनी केले.
पदाधिकारी, सदस्यांना नियुक्ती पत्र वाटप
रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाच्या विविध सेलकरिता निवड केलेल्या पदाधिकारी, सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील तालुका चिटणीस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनादेखील नियुक्ती पत्राचे वितरण केले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका चिटणीसांकडे नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह
शेतकरी कामगार पक्ष जिल्हा चिटणीस मंडळाची बैठक अलिबागमध्ये घेण्यात आली. या बैठकीत वेगवेगळ्या तालुक्यातील पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी आपापल्या शैलीने भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. एक वेगळा उत्साह यावेळी पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून आला.