ग्रामदैवतांच्या प्रदक्षिणेनंतर शिमगोत्सवाची सांगता

पालखीसोबत झाली रंगांची उधळण; आता 13 एप्रिलला जत्रौत्सव
| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर नगरीचे ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्‍वरी देवस्थानच्या शिमगोत्सवाची सांगता दरवर्षीप्रमाणे यंदा ग्रामदैवतांची ग्रामप्रदक्षिणा होऊन झाली. यावर्षी पालखी प्रदक्षिणेसोबतच रंगपंचमी सणाची रंगत वाढली. गेल्या दोन वर्षे कोविड-19 च्या लॉकडाऊनमुळे खंडित झालेला जत्रौत्सव यंदा 13 एप्रिलरोजी होणार असल्याने सर्व भाविकांना जत्रौत्सवाचे वेध लागले आहेत.

सोमवारी पोलादपूर शहरातील भैरवनाथनगर सहाणेवर गोंधळानंतर श्रीकाळभैरवनाथ आणि समशेर सोनाराच्या चेड्यास पशूनैवेद्य झाला. यावेळी ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये यंदा प्रथमच सह्याद्रीनगरामध्ये पालखी थांबविण्याचा निर्णय सरपंच बाबूराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. महाप्रसादानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ग्रामदैवतांची पालखी प्रदक्षिणेसाठी शहरातील विविध भागांमध्ये रवाना झाली. प्रत्येक वाडीवस्तीवर ग्रामदैवतांचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. तरूणांमध्ये यंदा ग्रामदैवताच्या पालखी प्रदक्षिणेवेळी रंगांची उधळण करण्याचाही उत्साह जल्लोष दिसून आला. सावंतकोंड, पार्टेकोंडच्या प्रदक्षिणेनंतर पोलादपूर शहराच्या वेशीमध्ये आलेल्या पालखीचे स्वागत ठिकठिकाणी उत्साहामध्ये करण्यात आले. प्रत्येक वाडीवस्तीतील मानकरी व सेवेकरी तसेच भाविक यांनी ग्रामदैवतांच्या आगमनाचा आनंद द्विगुणित केला. शिस्तबध्द व कोणत्याही प्रकारचा विलंब न करता यंदाच्या पालखी प्रदक्षिणेला वेळेवर श्रीकाळभैरवनाथ मंदिरामध्ये रवाना करण्याचे देवस्थान विश्‍वस्तांचे प्रयत्न दिसून येत होते.

पोलादपूर शहरातील ग्रामदैवतांच्या शिमगोत्सवानंतर येणारा जत्रौत्सव देखील तब्बल दोन वर्षांनंतर बुधवार, दि. 13 एप्रिल 2022 रोजी होणार असल्याने देवस्थान कमिटीसह भाविक आणि मानकरी सेवेकरी पुन्हा नियोजनासाठी प्रयत्नशील असून परिसरातील ग्रामदैवतांच्या सासनकाठी व पालख्यांच्या निमंत्रणासाठी तयारी सुरू होणार आहे.

Exit mobile version