जि.प.च्या माध्यमातून ठोस पावले

पाचही आदिवासीवाड्यांचा होणार विकास
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील तांबडीवाडी, काजूचीवाडी, खौसावाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ या पाच आदिवासी वाड्यांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या आदिवासी वाड्यांवर रस्ता तसेच पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पेण गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी दिली आहे.

पेण तालुक्यातील तांबडीवाडी, काजूचीवाडी, खौसावाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ या आदिवासीवाड्यांवरील नागरिकांना विविध मूलभूत सुविधांची वानवा जाणवत होती. यामुळे येथील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ठोस पावले उचलण्यात आली आहेत.

या वाड्यांकरिता रस्ता बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने 60 लाख रुपये निधीला तदर्थ मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत उपविभाग पेण बांधकाम अभियंता यांच्या कार्यालयामार्फत अंदाजपत्रक तयार करुन अंतिम प्रशासकीय मान्यता मिळविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तसेच या वड्यांकरिता जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. यासाठी 1 कोटी 26 लाख 10 हजार 102 रुपयांचा निधी मंजूर असून, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिले आहेत. यामुळे या वाड्यांवरील नागरिकांना भविष्यात चांगला रस्ता व मुबलक पाणी मिळणार आहे.

निकषाची परिपूर्ती नाही
बोरगाव हद्दीतील तांबडीवाडी, काजूचीवाडी, खौसावाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ या पाच आदिवासीवाड्यांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करावी अशी मागणी येथील नागरिकांची आहे. मात्र, आदिवासी व तांडा भागाकरिता ग्रामपंचायतीसाठी लोकसंख्या 1 हजार असणे आवश्यक आहे. मात्र, या वाड्यांवर 2011 जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 562 इतकी आहे. तर, अंगणवाडी सर्वेनुसार सद्यःस्थितीत येथे 685 लोकसंख्या असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध आहे. त्यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याकरिता निकष पूर्ण होत नाही.

Exit mobile version