पोलादपूरमध्ये सर्व्हिस रोडवर लाखोंची काँक्रीट भिंत

अंडरपास हायवेला फक्त सिमेंट फोमिंग

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर शहरातील पूर्वेकडील सर्व्हिसरोडवर लाखोंची काँक्रीटभिंत आणि अंडरपास जाणार्‍या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला फक्त सिमेंट फोमिंग केल्याचे विचित्र चित्र दिसत आहे. तसेच मातीच्या बॉक्स कटींगवर केलेल्या सिमेंट फोमिंगवर संरक्षक कठडे बसविण्यासाठी चक्क काँक्रीटचे आडवे लांबलचक वजनदार बीम बसविल्याचेही अभियांत्रिकी तज्ज्ञांना आव्हान देणारे बांधकाम केल्याचे दिसून येत आहे.

दोन्ही सर्व्हिसरोडच्या दुसर्‍या बाजूला महामार्गासाठी बॉक्स कटींग करून केलेला अंडरपासचा खंदक आहे. पोलादपूर येथील रयत विद्यामंदिराच्या इमारतीलगतचा रस्ता सर्व्हिस रोडच्या रूंदीकरणामध्ये कापल्यानंतर येथील लालमातीचा ढिगारा सर्व्हिस रोडवर कोसळू नये यासाठी लाखो रूपये खर्च करून काँक्रीटची संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. यासाठी राजकीय आणि माध्यमांचा दबाव वापरण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, अंडरपासमधील खंदकातून जाणार्‍या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिमेंट फोमिंग केलेल्या बॉक्स कटींगमधून अनेकवेळा लालमातीचे ढिगारे कोसळूनही याठिकाणी काँक्रीटच्या भिंती बांधण्यात आल्या नाहीत.

याउप्पर, या सिमेंट फोमिंग केलेल्या बॉक्स कटींगच्या वरील बाजूला असलेल्या पूर्व आणि पश्‍चिमेकडील सर्व्हिस रोडवर लोखंडी संरक्षक कठडे बसविण्यासाठी अंदाजे 12 इंच रूंदीचे 15 इंच जाडीचे आणि तब्बल अर्धा कि.मी.लांबीचे काँक्रीटचे बीम आडवे बांधण्यात येऊन बॉक्स कटींगवर या बीमचे ओझं टाकलं आहे. यामुळे सिमेंट फोमिंगमधून कोठेही लालमातीचे ढिगारे कोसळल्यास वरील बीमही निसटून अंडरपासच्या खंदकातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोसळून महामार्ग आणि सर्व्हिस रोड या दोन्ही मार्गांवरील वाहतूक एकाचवेळी ठप्प होण्याची शक्यता दिसून येत आहे.

Exit mobile version