काँक्रीटीकरण करण्यास सुरुवात
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कळंब, पाषाणे-वांगणी या रस्त्यावर आर्डे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर गोरक्षनाथ मठाजवळ मोठे खड्डे पडले होते. तसेच, कळंब-वांगणी भागातील आर्डे गावाच्या परिसरात बांधकाम विभागाने रस्त्याचे काँक्रीटीकरण केलेले नाही. परिणामी पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे वाहनचालकांडून त्या भागातील रस्त्याची सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी सातत्याने होत होती. संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाला सुरूवात केली जात नसल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. दरम्यान, समजा माध्यमांद्वारे जोरदार आवाज उठवल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली असून आता त्या ठिकाणी काँक्रीटीकरण कामाला सुरुवात झाली आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी कळंब, पाषाणे-वांगणी रस्त्यावरील गावे असलेल्या ठिकाणी काँक्रीटीकरण आणि अन्य ठिकाणी डांबरीकरण पट्टे मारण्याचे नियोजन होते. त्यानुसार निधी देखील मंजूर झाला होता. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने त्यातील अनेक कामे अपूर्ण ठेवल्याने सर्वसामान्यांची एसटी बससेवा बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नोकरदारांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच, आर्डे गावाच्या हद्दीमधील काँक्रीटचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पूर्ण झालेले नव्हते. त्याचा फटका या भागातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे. येथील मठाच्या समोरच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून वेळोवेळी पडणाऱ्या पावसामुळे या रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डेमय रस्त्याबद्दल आणि तेथून पुढे माले गावाच्या आजूबाजूला न झालेल्या कामाबद्दल ठेकेदारांवर कारवाई करणार का? असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला होता. तसेच, याबाबत स्थानिकांकडून समाज माध्यमांवरून सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत जोरदार टिका आणि तक्रारी केल्या जात होत्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली असून अनेक वर्षे अपूर्ण ठेवण्यात आलेल्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.
ठेकेदाराचे चोचले पुरविणारा रस्ता
कळंब, पाषाणे-वांगणी हा रस्ता बनविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने आतापर्यंत किमान 20 कोटी खर्च केले आहेत. मात्र, तरीदेखील हा रस्ता अद्यापपर्यंत एकदाही अखंडपणे डांबरीकरण करून तयार होऊ शकला नाही. ठेकेदाराचे चोचले पुरविण्यासाठी कळंब-पाषाणे रस्ता असल्याची तक्रार सातत्याने वाहनचालक आणि स्थानिकांकडून होत आहे.
