| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-कळंब राज्यमार्गावरील नेरळ रेल्वे फाटक ते साई मंदिर भागातील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. ठेकेदार कंपनीच्या चुकीमुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती आणि त्यामुळे वाहनचालकांचे हाल होत होते. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांनी वाहनचालकांचे हाल थांबवावे, यासाठी संबंधित ठेकेदाराला काँक्रीटीकरणाचे कामे करण्यास भाग पाडले आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ रेल्वे फाटक ते साई मंदिर भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. त्या भागातील रस्त्याची खोदाई रस्त्याचे काँक्रीटीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने केली होती. मात्र, काँक्रीटीकरण केले नव्हते. ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवल्याने आणि त्यावर कोणतेही काम केले नसल्याने मागील तीन महिन्यात स्थानिकांना या खड्डेमय रस्त्याने वाहतूक करावी लागली होती. तसेच, या रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले होते.त्यात पाऊस पडल्यानंतर रेल्वे फाटकापासून निर्माण नगरी गेटपर्यंत असलेल्या भागातील रस्त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले होते. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य सुनिता मोरे आणि पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी संबंधित ठेकेदाराला खराब रस्त्याच्या ठिकाणी बोलावून घेतले. वाहनचालकांची गैरसोय लक्षात घेऊन ठेकेदाराने तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आणि रस्त्याचे काम वेगाने सुरू केले.







