डॉ. केजरीवाल यांच्या मारहाणीचा निषेध

खोपोलीतील डॉक्टर आक्रमक; निषेधार्थ एक दिवस बाह्यरुग्ण सेवा बंद

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोलीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत केजरीवाल यांना झालेली मारहाण आणि सुमित्राराज रुग्णालयातील तोडफोडीच्या घटनेचा खोपोलीतील विविध डॉक्टर संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ 9 ऑक्टोबर रोजी एक दिवस बाह्यरुग्ण तपासणी सेवा बंद ठेवून डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. मात्र, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती खोपोली डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सतीष जाखोटीया यांनी दिली.

या प्रकरणाची माहिती देण्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी खोपोलीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खोपोली डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सतीष जाखोटीया, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष कटकदौड, खालापूर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत पाटील, सेक्रेटरी डॉ. नागरगोजे, बालरोगतज्ज्ञ डॉ. जयंत केजरीवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संगिता केजरीवाल यांच्यासह खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील अनेक डॉक्टर उपस्थित होते.

खोपोलीतील सुमित्राराज रुग्णालयात सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जन्मलेल्या नवजात बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेत डॉ. जयंत केजरीवाल यांना मारहाण करण्यात आल्याचा तसेच रुग्णालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे खोपोलीतील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version