| कर्जत | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या अंतर्गत येणारे सर्व वैद्यकीय सेवेतील कर्मचारी हे चांगली सेवा देत आहेत. मात्र, आपण रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणखी प्रभावीपणे वैद्यकीय सेवा बजावली पाहिजे, असे प्रतिपादन रायगड मेडिकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी यांनी केले. रायगड मेडिकल असोसिएशन आणि महाड डॉक्टर्स असोसिएशनतर्फे सातवी झोनल वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
या वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर असोसिएशन महाडचे अध्यक्ष डॉ. नितीन देशमुख, वालावलकर हॉस्पिटलचे रेडिओलॉजिस्ट डॉ. नेताजी पाटील, रायगड मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. प्रशांत गांगल, क्रीडा सचिव डॉ. निलेश म्हात्रे आदींसह माजी अध्यक्ष डॉ. शेखर दाभाडकर, डॉ. राजेंद्र पाटील, कार्यकारिणी सदस्य डॉ. राजेश शिंदे, डॉ. सुकाळे, डॉ. सचिन बुटाला, तसेच जिल्ह्यातील अनेक डॉक्टर उपस्थित होते.
ग्रामीण भारतातील वैद्यकीय समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा या परिषदेतचा मुख्य विषय होता. चिपळूणच्या ग्रामीण भागात हे रुग्णालय प्रचंड प्रमाणात कार्यरत आहे. या ठिकाणी अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल होतात. त्यातील काही महत्त्वाच्या केसेस आणि अभ्यास पूर्ण माहिती डॉ. मृदुल भटजिवाले (न्यूरोसर्जन), डॉ. अभय गोंधणे (न्यूक्लिअर मेडिसिन विशेषज्ञ), डॉ. नेतेजी पाटील (इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट) यांनी वेगवेळ्या सत्रात दिली. या कार्यक्रमामुळे ग्रामीण वैद्यकीय कार्यात ज्ञानाची देवाणघेवाण, सहकार्य आणि शैक्षणिक गुणवत्तेला मोठी चालना मळािली. तसेच, रायगड जिल्ह्यातील डॉक्टरांच्या 10 जानेवारी 2026 ला कर्जतला होणाऱ्या भव्य वैद्यकीय परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.







