द्रोणागिरी नोडमधील इमारतींची दुरवस्था

सिडको प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
। उरण । वार्ताहर ।
उरण परिसरात सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची निर्मिती करण्यात आली आहे. या नोडमध्ये बिल्डर लॉबीकडून इमारतींचे जाळे विणले जात आहे. इमारती उभारत असताना लागणारे मटेरियल निकृष्ट दर्जाचे व नियमांची पायमल्ली बिल्डर करीत आहेत. त्यामुळे आताच तीन ते चार वर्षांपूर्वी उभारलेल्या इमारतींची दुरवस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

याबाबत सिडको प्रशासनाकडे विचारणा केली असता ते हात झटकून मोकळे होत आहेत. त्यामुळे काही महिन्यांनी रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू होईल, त्यावेळी या नोडमधील इमारतींची अवस्था भयानक होण्याची शक्यता भूगर्भतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तरी याचा सारासार विचार द्रोणागिरी नोडमधील रहिवाशांनी करणे गरजेचे बनले आहे.

उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होऊ लागल्याने सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडची निर्मिती करण्यात आली आहे. भविष्यात उरणपर्यंत रेल्वे येणार असल्याने या भागाचे महत्त्व वाढले आहे. द्रोणागिरी नोडमध्ये बिल्डर लॉबीने इमारतींचे जाळे विणले जात आहे. बिल्डर लॉबीकडून इमारत उभी करीत असताना, सिडकोने दिलेल्या नियमांची पायमल्ली करून सर्रासपणे निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरतात त्यामध्ये रेतीऐवजी ग्रीटचा वापर, सिमेंटचे प्रमाण कमी, खार्‍या पाण्याचा सर्रासपणे वापर होत आहे. विशेष म्हणजे, काही इमारतींचे मुख्य असलेले कॉलमच खोलवर न करता इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे काही इमारतींची अवस्था आताच बिकट झालेली दिसत आहे. काही इमारती खचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, ज्यावेळी रेल्वे वाहतूक सुरू होईल त्यावेळी रेल्वे वाहतुकीने हादरून इमारतींना धोका पोहचण्याची शक्यता भूगर्भ तज्ज्ञांनी व्यक्त केली.

Exit mobile version