रेशनिंग दुकानांमधील गैरव्यवहाराबाबत सुनावणीस अधिकार्‍यांची चालढकल

पाचाडकरांचा आमरण उपोषणाचा इशारा कायम

| महाड | प्रतिनिधी |

रेशनिंग दुकानांमधील गैरव्यवहाराबाबत पाचाड ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने सुनावणी घेऊन कारवाई केली जाईल, असे कळवले होते. मात्र, सातत्याने तीन तारखा देऊनदेखील सुनावणी लागत नसल्याने पाचाड ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. तसेच येत्या 20 तारखेला चवदारतळे सत्याग्रह स्मृतिदिनी आमरण उपोषणाचा इशारा कायम ठेवला आहे.

ऐतिहासिक पाचाड गावामध्ये असलेले रास्त भाव धान्य दुकान परवानाधारकाने तात्पुरत्या स्वरूपात अन्य व्यक्तीस चालवण्यास दिले होते. मात्र सदर व्यक्तीने ग्राहकांशी अर्वाच्य भाषेत बोलणं, धान्य वाटपात केलेला गैव्यवहार, ग्राहकांना पावती न देणे असे प्रकार सुरू केले होते. धान्य देताना ऑनलाइनवर वेगळीच नोंद करून ग्राहकांची फसवणूक केली आहे. प्रत्यक्ष दिलेले धान्य आणि ऑनलाईन वर केलेली नोंद यामध्ये मोठी तफावत आहे. याबाबतचे सबळ पुरावे पाचाडमधील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते शाश्‍वत धेंडे यांनी प्रशासनासमोर सादर केले. तरी देखील कारवाई न झाल्याने आमरण उपोषण सुरू केले होते.

यावेळी स्थानिक प्रशासनाने मध्यस्थी करत कारवाईचे आश्‍वासन दिले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी सुनावणी लावून कारवाई केली जाईल असे लेखी कळवले होते. मात्र रात्री तलाठी कार्यालयाकडून सुनावणी रद्द करून पुढील तारीख 14 मार्च अशी कळवली. यावेळी देखील अशाच पद्धतीने दूरध्वनी द्वारे सुनावणी पुढे ढकलत आता 21 मार्च रोजी सुनावणी घेतली जाईल, असे कळवले आहे. मात्र प्रशासन वेळ मारत उपोषणकर्ते सामाजिक कार्यकर्ते शाश्‍वत धेंडे यांची तसेच ग्रामस्थांची दिशाभूल केली जात आहे यामुळे रास्त भाव धान्य दुकानदार परवानाधारकांची शासन पाठराखण करत आहे का असा सवाल पाचाड ग्रामस्थांनी करून आम्ही ग्रामस्थ दिनांक 20 मार्च रोजी पाचाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आमरण उपोषण कायम करत असल्याचा इशारा ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

यावेळी देविदास गायकवाड, गोपाळ गायकवाड, भगवान गायकवाड, प्रशांत गायकवाड, अनिरुद्ध गायकवाड, अनिल गायकवाड, उमेश गायकवाड, बयाजी गायकवाड, सुरेश गायकवाड, दिलीप गायकवाड आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने आमरण उपोषण मागे घ्यावे म्हणून सुनावणी लावण्याचे आश्‍वासन देत वेळ मारून नेली होती. मात्र तरी देखील सुनावणी लावत नसल्याने येत्या 20 तारखेला पुन्हा आमरण उपोषण केले जाईल.

शाश्‍वत धेंडे, सामाजिक कार्यकर्ते पाचाड

सुनावणी लावण्याचा तारखा दिल्यामुळे ग्रामस्थांनी परिपूर्ण तयारी केली होती, प्रत्येक वेळी अलिबाग जाण्याची तयारी झाल्यानंतर सुनावणी रद्द केल्याचे कळवले जाते. यामुळे प्रशासन रेशनिंग दुकानदारकाला पाठबळ देते का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

देविदास गायकवाड, ग्रामस्थ पाचाड
Exit mobile version