वारांगणासाठी कार्यशाळेचे आयोजन

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती, पनवेल यांच्या सभागृहामध्ये देहविक्री करणार्‍यांना शिक्षित करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला बाल विकासा कडील योजना, तहसीलकडील योजना, एड्स नियंत्रण बाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी समिती यांचे अध्यक्षतेखाली हे आयोजन करण्यात आले.

शासनाने विधी सेवा प्राधिकरणामार्फत देहविक्री करणार्‍यांना शिक्षित करण्यासाठी कार्यशाळा आयोजित कराव्यात असे निर्देश केले होते. त्यानुसार पनवेल येथे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. या कार्यशाळेत एम एम गुंजाळ यांनी देहविक्री करणार्‍यांना शिक्षित करणे आणि तस्करी व लैंगिक शोषणाचे बळी यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील विविध योजनांची माहिती दिली. महिला बाल विकास अधिकारी अशोक पाटील यांनी महिला बाल विकास कडील योजना समजावून सांगितल्या.

तहसीलदार विजय तळेकर यांनी तहसीलकडील योजनांची माहिती देऊन महिलांना मार्गदर्शन केले. जिल्हा एड्स नियंत्रण कमिटीचे नियोजन अधिकारी यांनी एड्स बाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Exit mobile version