। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड यांच्या संयुक्तविद्यमाने एआरटी केंद्र, जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. खालापूर तालुक्यातील एआरटी केंद्र लोधिवली येथे तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ.रणजित खंदारे, जिल्हा कायक्रम व्यवस्थापक संजय माने उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये माने यांनी जिल्ह्यामध्ये असलेल्या एचआयव्हीसह जगणार्या व्यक्तींना देण्यात येणार्या शासकीय सेवा सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच एचआयव्हीसह जगणार्या व्यक्तींना शासकीय सेवा सवलती सहज मिळाव्यात, याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेसाठी एक खिडकी योजना सुरु करून शासकीय सेवा देण्यात येणार असल्याचे सांगितले. याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मदत घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास खालापूर न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश आर. डी.वाबळे, सह दिवाणी न्यायाधीश पी.एम.माने हजर होते. त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये एचआयव्ही सह जगणारा व्यक्ती व कायदे या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी एआरटी केंद्र एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. सालगोत्र, जिल्हा न्यायाधीश जे. डी. वाडने हे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय माने यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता एआरटी केंद्र लोधिवली, खालापूर व एआरटी केंद्र एमजीएम हॉस्पिटल कामोठे, पनवेल येथील अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले