महिन्याभरात 27 कोटींचा मुद्देमाल जप्त
। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात आचारसंहितेच्या कालावधीत करण्यात आलेल्या जप्तीच्या कारवाईत आतापर्यंत एकूण 27 कोटी 43 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी जवळपास साडेतीन पटीने अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
आचारसंहितेच्या कालावधीत बेकायदेशीर दारू, शस्त्र, अमली पदार्थ यांसह मौल्यवान धातूच्या वाहतुकीचा सुळसुळाट सुरू होता. कोणत्याही आर्थिक प्रलोभनाशिवाय निवडणुका पार पाडल्या जाव्यात यासाठी रायगड पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती. यामध्ये हा मुद्देमाल सापडला आहे. सापडलेल्या मुद्देमालात 48 लाख रुपयांची रोख रक्कम पनवेल, कर्जत, उरण आणि पेण मतदारसंघात सापडली आहे. याच कालावधीत दोन बंदुका व एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. तर अलिबाग, महाड आणि श्रीवर्धन मतदारसंघात पैशांची वाहतूक करण्याचा एकही प्रकार आढळून आला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात 73 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याकडून मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी पैशाचा वापर होण्याची शक्यता पाहून रायगड पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या होत्या. 15 ऑक्टोबर रोजी आचारसंहिता सुरू झाल्यापासून 18 नोव्हेंबरपर्यंत विविध ठिकाणी छापे टाकून, तपास नाक्यावर हा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू असल्याने विविध अंमलबजावणी यंत्रणांकडून बेहिशोबी मुद्देमाल जप्तीची कारवाई सुरू आहे. त्यात बेहिशेबी रोकड, दारू, ड्रग्स आणि मौल्यवान धातूंच्या वस्तूंचा समावेश आहे. जिल्ह्यातून या कालावधीत एक कोटी रुपयांची दारू, सहा कोटी रुपयांचे अमली पदार्थ, पाच कोटी 20 लाख रुपयांचे मौल्यवान धातू जप्त करण्यात आले आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल रोख - 48 लाख
मद्यसाठा - 1 कोटी 67 लाख
अमली पदार्थ -6 कोटी 97 लाख
मौल्यवान धातू- 5 कोटी 20 लाख
इतर वस्तू -13 कोटी 10
मुद्देमाल सापडलेले मतदारसंघ
पनवेल - 13 कोटी 85 लाख
कर्जत - 11 कोटी 12 लाख
उरण- 6 लाख 82 हजार
पेण - 35 लाख 88 हजार
अलिबाग- 22 लाख 40 हजार
श्रीवर्धन - 37 लाख 71 हजार
महाड - 6 लाख 82 हजार
एकूण - 27 कोटी 43 हजार